अनेक वर्षे रखडलेल्या कामांना सुरूवात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाषाणे, माले, साळोख, पोशीर व वारे या भागातील नागरीक वीज समस्येने ग्रासले होते. या समस्यांवर योग्य ती उपाययोजन व्हावी, यासाठी मंगळवारी (दि.1) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी महावितरण कंपनीसोबत मध्यस्थाची भूमिका बजावल्यामुळे महावितरण कंपनीवर निघणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. तसेच, अनेक वर्षे रखडलेल्या वीज सुधारणा यंत्रणा कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाषाणे, माले, साळोख, पोशीर, वारे आणि तेथील वीज उप केंद्र या भागातील नागरीक विजेच्या समस्यांने ग्रासले होते. येथील मंजूर असलेल्या वीज यंत्रणा सुधारणा कार्यक्रमाच्या 51. 53 लाख खर्चाच्या योजनेचे काम काही महिने राखडले आहे. ते काम वेळेत पूर्ण न झाल्याने या भागातील रहिवाशांना कमी दाबाने वीज पुरवठा तसेच सतत वीज प्रवाह खंडित होण्याचा परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील चार ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांसोबत बैठका घेऊन सामाजिक कार्यकर्ते उत्तम पालांडे यांनी सर्वांना सोबत घेऊन पत्रव्यवहार सुरू केले. मात्र, महावितरण कंपनी हालचाल करीत नसल्याने अखेर मंगळवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्या आला होता. आज एक जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, महावितरण कंपनीकडून अनेक महिने रखडलेल्या कामाला सुरुवात करण्यात आली. वीज ग्राहक संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला. त्यामुळे मोर्चा रद्द करण्यात आला आहे.






