| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक व्यावसायिकांच्या मालवाहतूक वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय पेणचे अधिकारी नियमांवर काटेकोर बोट ठेवून कारवाई करीत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यवसाय करणाऱ्या वाहनांच्या चालक-मालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे. परंतु, हिच कारवाई करताना पेण आरटीओ अधिकारी दुजाभाव दाखवत असल्याची तक्रार म्हसळा तालुका माजी सभापती महादेव पाटील यांनी खासदारांकडे केली आहे.
श्रीवर्धन तालुक्यात उत्खनन करण्यात येत असलेली मायनिंग मिश्रित माती वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर पेण आरटीओ कार्यालयाकडून योग्य ती कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले आहे. म्हसळा श्रीवर्धन राज्य व राष्ट्रीय मार्गावरील दोन महिन्यांत मायनिंग वाहतूक करणाऱ्या अनेक अवजड वाहनांचे अपघात झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही आरटीओ अधिकाऱ्यांनी कुठेही ठोस कारवाई केलेली दिसत नाही. तसेच, अनेक प्रकारचे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मुदत संपली असताना कित्येक वाहन रस्तावर बिनधास्त चालताना दिसत आहेत. मात्र, या गाड्यांवर आरटीओ अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. जे चालक-मालक शासनाचा नियमित कर भरून उद्योग करीत आहेत त्यांनाच आरटीओ अधिकारी नियमांवर बोट दाखवून आपल्या अधिकारात दंडात्मक कारवाई करीत आहेत. यावर कोणी काही बोलत नाही. बोललो तर ऐकणार कोण, असा प्रश्न पडला असल्याने महादेव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.







