कचरामुक्त शहर मानांकनात थ्री स्टार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल शहराने स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये देश आणि राज्यपातळीवर भरीव कामगिरी बजावली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणामध्ये यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये तीन लाख ते दहा लाख लोकसंख्या गटात पनवेल महानगरपालिकेला देशात सहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. हा सन्मान म्हणजे पनवेल शहराच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या कार्याची पावती आहे. कचरामुक्त शहर मानांकनात थ्री स्टार आणि ओडीएफमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस ही सर्वोच्च श्रेणीदेखील शहराने सलग राखली आहे. महापालिकेस मिळालेल्या या यशाबद्दल गुरुवारी झालेल्या प्रशासकीय महासभेत आयुक्त चितळे यांनी घनकचरा व स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते व त्यांच्या टिमचे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
स्वच्छतेच्या आघाडीवर केवळ क्रमांकच नव्हे तर, गुणवत्तेचेही मानांकन मिळवण्यात पनवेल महानगरपालिकेला यश आले आहे. या यशाबरोबरच पनवेल महानगरपालिकेने आपल्या यशाची परंपरा कायम राखत कचरामुक्त शहर मानांकनात थ्री स्टार मानांकन (3-Star Garbage Free City) शहराने सलग चौथ्या वर्षी कायम राखले आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतागृह वापर यामधील उत्कृष्ट कार्यासाठी ODF (Open Defecation Free) कॅटेगरी मधील वॉटरप्लस (Water Plus ) ही सर्वोच्च श्रेणीदेखील शहराने सलग राखली आहे. हे मानांकन शहरातील स्वच्छतेबाबतची नागरिकांची जाणीव, शिस्तबद्धता आणि महानगरपालिकेच्या सततच्या प्रयत्नांचे फलित आहे.
या यशामध्ये महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे कुशल मार्गदर्शन, तसेच उपायुक्त डॉ. वैभव विधाते आणि सहा. आयुक्त श्रीराम पवार, विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका अभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या टीमने संपूर्ण अभियानासाठी विशेष नियोजन, मार्गदर्शन आणि अंमलबजावणी करीता उल्लेखनीय मेहनत घेतली. सर्वेक्षणाच्या वेळी शहरातील विविध स्वच्छता उपक्रम, जनजागृती मोहिमा, नागरिकांचा सहभाग आणि तांत्रिक व व्यवहार्य उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यामुळेच पनवेल शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत एक आदर्श मॉडेल ठरले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या या यशात नागरिकांचा सहभागदेखील तितकाच मोलाचा ठरला आहे. घराघरातून कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छतेविषयी जनजागृती, आणि लोकप्रतिनिधी व नागरिकांचे प्रशासनास दिलेले सहकार्य यामुळेच ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाली. महानगरपालिका भविष्यातही स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याच्या दिशेने कार्यरत राहणार आहे. पनवेल महानगरपालिका ही यशाची शिडी चढत असताना, ही फक्त सुरुवात असून स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहर निर्मितीसाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागामुळे हे यश शक्य झाले असून, पुढील काळातही पनवेल महानगरपालिका अशाच प्रकारे देशपातळीवर उत्कृष्टता सिद्ध करत राहील, असा विश्वास उप आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी व्यक्त केला.







