रस्त्यावर जागोजागी खड्डे, अनेक ठिकाणी भेगा
| सुतारवाडी | प्रतिनिधी |
कोलाड, वरसगावपासून सुतारवाडीमार्गे या दहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी लहान मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या भेगा रस्त्यावरील खडी बाहेर येणे असे एक ना अनेक प्रकार सध्या पाहावयास मिळत आहेत. या रस्त्याच्या कामाबाबत आता जनतेतून शंका व्यक्त करण्यात येत आहे. कसरत करून मार्ग काढावा लागणार आहे.
भिरा फाट्यावरून सुतारवाडीमार्गे पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस अनेक लहान-मोठी वाहने धावत असतात. तसेच विले भागाळे या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कच्चा माल नेण्या-आणण्यासाठी ट्रेलर सातत्याने धावत असतात. त्याचप्रमाणे सुतारवाडी परिसरामध्ये अनेक फार्महाऊस असल्यामुळे वर्षाचे बाराही महिने सातत्याने पर्यटक येत असतात. वाहनांच्या सतत ये-जा करण्याने येथील सुस्थितीत असलेला रस्ता यावर्षी मात्र उखडलेला दिसत आहे. जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. किमान गणपती सणाअगोदर ज्या ज्या ठिकाणी खड्डे उखडलेले आहेत, ते खड्डे बुजवण्याची व्यवस्था संबंधित खात्याने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.







