| मुंबई | प्रतिनिधी |
रात्रीच्या जेवणात जास्त चिकन आणि चायनीज न दिल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने महिलेवर लोखंडी सळईने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील ट्रॉम्बे भागात घडला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अजय दाभाडे (38) याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित स्वाती दाभाडे (37) हिने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. 23) रात्री जेवणाच्या वेळी अजयने तिला अधिक चिकन व चायनीज वाढण्याची मागणी केली. त्यावर स्वातीने जेवण संपल्याचे सांगितले. या उत्तराने संतप्त होऊन अजयने लोखंडी सळईने तिच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वातीला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रॉम्बे पोलिसांनी अजय विरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.







