| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील गावांना गेल्या काही दिवसांपासून उधाणाचा धोका जाणवायला लागला आहे. या आठवड्यात मारळ व आरावी येथे उधाणामुळे किनाऱ्यावरील सुरूची झाडे व केतकीची बने भूईसपाट झाली आहेत.
पावसाळी दिवसात अनेकवेळा समुद्राला उधाण येते. अद्यापपर्यंत उधाणामुळे विषेश नुकसान झाले नव्हते. यावेळेस आरावी व मारळ येथे उधाणाने वाळूचे डूंग नष्ट झाले तर मारळ येथील दगडी बंधारा उधाणाने वाहून गेला. या दोन्ही गावांतून पाणी वाडी, शेतीत शिरल्याने पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उधाणाची तिव्रता बघता भविष्यात पाणी वस्तीत येण्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लवकरच शासनाकडून धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी आरावी व मारळ येथील स्थानिक करीत आहेत.






