शेकाप कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी
| पेझारी | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन पनवेल येथे शनिवार, दि. 2 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर खारेपाट विभागातील कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, खारेपाट विभागात नाक्या-नाक्यावर वर्धापनदिनाला शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. पेझारी नाका तर पताका, झेंडे आणि बॅनर्समुळे लाल बावटेमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी खारेपाट विभागातील शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

दरम्यान, पनवेल येथील वर्धापन दिनासाठी पेझारी विभागातील खारेपाट्यांतून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया सेलच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, सहचिटणीस नरेश म्हात्रे, तालुक्यातील विविध सेलचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून या मेळाव्याची जोरदार तयारी झाली असून, अनेक ठिकाणी या मेळाव्याचे गावाच्या वेशीवर बॅनर लावून ‘चलो पनवेल, चलो पनवेल’ अशा प्रकारचा जल्लोष सुरू केलेला आहे.
पेझारी विभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी, कुर्डूस, चिखली, कुसुंबळे, मेढेखार, श्रीगाव, पोयनाड, ताडवागळे, वडवली, बांधण, वाघोडे, कोपर, चरी, शहापूर, मोठे शहापूर, ढेरंड, घसवड, शाहबाज या गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता, शेकापच्या कार्यकर्त्यांनी अनेक दुचाकी, चारचाकी, बसेस आदी वाहनांची वर्धापन दिनासाठी जाण्याची तयारी केली असून, या आपण पनवेल येथे होणाऱ्या वर्धापन दिनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले.
पेझारी नाक्यावर होणार भाईंचे स्वागत
पेझारी नाक्यावर या वर्धापन दिनाची तयारी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झेंडे व पताका लावण्यात आल्या असून, पेझारी नाका येथे सकाळी नऊ वाजता पंत बाळेकुंद्री चौक येथे राज्य सरचिटणीस भाई जयंत पाटील, सुप्रिया पाटील, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया अध्यक्ष चित्रलेखा पाटील, पाटील, पक्षाचे पदाधिकारी यांचे खारेपाट विभागातील कार्यकर्ते स्वागत करणार असून, त्याची जोरदार तयारी चालू असल्याची माहिती अलिबाग तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, विविध सेलचे पदाधिकारी यांनी यावेळी दिली.






