| अलिबाग | प्रतिनिधी |
कारगिल युद्धात शहिद झालेले सहाणगोठी येथील निलेश तुणतुणे यांचा 27 वा स्मृतिदिन शुक्रवारी (दि.1) सहाणगोठी येथे भव्यदिव्य कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. रायगड पोलिसांकडून तीन फेऱ्यांची सलामी देण्यात आली. माजी सैनिक, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक व पोलीस विभागाकडून पुष्पचक्र, पुप्षहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.

शहिद निलेश तुणतुणे ट्रस्ट व पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ आयोजित केला होता. यावेळी शहिद निलेश तुणतुणे यांची आई निर्मला तुणतुणे, वडील नारायण तुणतुणे, अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतिक्षा खेतमाळीस, पोलीस निरीक्षक किशोर साळे, निवृत्त लष्कर अधिकारी कॅप्टन उमेश वाणी, सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी ए. डी. शेख, राष्ट्रपती पदक पुरस्कर्ते तथा माजी सेना मेडल हवालदार शांताराम महाडीक, राजेंद्र म्हात्रे, अमर राणे, अनंत चवरकर, सरखेल कान्होजी आंग्रे माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी, सदस्य, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, शहिद निलेश तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, बेलोशीचे माजी सरपंच कृष्णा भोपी, आदिवासी समाज कायदेशीर सल्लागार ॲड. के.डी. पाटील, विस्तार अधिकारी कृष्णा पिंगळा, गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, जिल्हा परिषदेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला रायगड पोलीस व स्काऊट गाईडच्या वतीने संचलन करण्यात आले. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने बंदूकीच्या तीन फैऱ्या देऊन शहिद तुणतुणे यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंत शहिद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. बोरपाडा जिल्हा परिषद शाळेसह खानाव शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांमधून नृत्याचे सादरीकरण केली. त्यानंतर लेझीम पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. एक आगळ्या वेगळ्या उपक्रमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी शहिद तुणतुणे यांच्या कार्याची माहिती दिली.







