| अलिबाग | प्रतिनिधी |
पंजाब प्रश्न नष्ट होण्यासाठी सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविल्यामुळे शहिद झालेले भारताचे माजी लष्करप्रमुख, जनरल अरुणकुमार वैद्य यांचा 39 वा स्मृतीदिन अलिबागमध्ये साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शहरातील सरखेल आंग्रेवाड्यासमोरील अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये रविवारी (दि.10) सकाळी 10 वाजता होणार आहे.
जनरल अरुणकुमार वैद्य हे अलिबागमधील इंडस्ट्रीयल हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते. भारतीय सैन्य दलात लष्करप्रमुख असताना 29 सप्टेंबर 1985 मध्ये त्यांनी या हायस्कूलला सदिच्छा भेट दिली होती. लष्करप्रमुख पदावरून सेवानिवृत्त होताच त्यांचे शासकीय संरक्षण काढण्यात आले. पूणे येथे आयुष्याची सायंकाळ समाधानाने घालवीत असताना शीख आतिरेक्यांकडून 10 ऑगस्ट 1986 रोजी ते शहिद झाले. अलिबाग शहरावर शोककला पसरली. शहिद अरुणकुमार वैद्य यांच्या कार्याची माहिती चिरकाल राहण्यासाठी पत्रकार बळवंत वालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे इंडस्ट्रियल हायस्कूलला माजी लष्कर प्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य असे नाव को.ए. सो. या शिक्षण संस्थेने दिले. अरुणकुमार वैद्य यांचा स्मृतीदिन अलिबाग येथे शासकीय इतमामाने साजरी होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या शिफारशीसह प्रकरण मंत्रालय मुबई येथे पाठविले आहे.






