जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, युद्धपातळीवर तपास सुरू
| अलिबाग | प्रमोद जाधव |
आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने गतवर्षी लाडकी बहीण योजना सुरु केली. योजनेस पात्र ठरणाऱ्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात आले. आता मात्र पात्र ठरलेल्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 60 हजार महिलांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात आली. 21 ते 65 वर्षे पूर्ण असलेले, एका कुटुंबातील विवाहित व अविवाहित महिलांना लाभ देण्याचे निकष लावण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. शिधापत्रिका, आधारकार्ड आदी कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरण्यात आले होते. या योजनेसाठी सहा लाख 25 हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 5 लाख 76 हजार महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले. पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये गतवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी योजनेचे पैसे जमा करण्यात आले. तेव्हापासून या योजनेला सुरुवात झाली. दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यात जमा होत असल्याने महिलांमध्ये देखील आनंद निर्माण झाला होता. मात्र, लाडक्या बहिणी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. साठ हजार महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली आहे.
अनेकांनी 21 वर्षे नसताना, 21 वर्षे पुर्ण झाल्याचे दाखवून अर्ज भरले आहेत. त्यामुळे वयोमर्यादेत बसत नसताना त्यांनी लाभ घेतला आहे. एकाच कुटूंबातील तीन ते चार महिलांनी या योजेचा लाभ घेतला आहे. काही महिला अन्य योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारी कर्मचारी आहेत, की नाही, याची या सर्व बाबीची पडताळणी ग्रामपातळीवर केली जाणार आहे. योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. परिणामी निकषात न बसलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आठ दिवसांत सर्वे सुरु केले जाणार असून, त्याची यादी जिल्हा स्तरावरून शासनाकडे पाठविली जाणार आहे.
अन्य व्यक्तींना माहिती देऊ नका
महिलांची पडताळणी सुरु केली आहे. अंगणवाडी सेविकांनाच हे काम दिले आहे. अन्य कोणीही व्यक्ती येऊन माहिती घेत असल्यास त्यांना ती माहिती देऊ नका. त्यामुळे महिलांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित
सरकारने निवडणुकीपूर्वी गतवर्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली होती. या योजनेची अंमलबजावणी अंगणवाडी सेविकांनी केली. घरोघरी जाऊन अनेक महिलांचे अर्ज भरून घेतले होते. एक अर्जासाठी 50 रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापर्यंत अंगणवाडी सेविकांना भत्ता देण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र महिला व बालविकास विभागाकडून निधी एकात्मिक विकास विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.







