कोळी समाजाकडून समुद्राला नारळ अर्पण
| अलिबाग | प्रतिनिधी |
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्ह्यात पारंपारिक वेशभूषा करीत मिरवणूक काढण्यात आली. बेंजो, ढोलताशांच्या तालावर आणि गाण्यांच्या ठेक्यावर नाचत नारळी पौर्णिमेचा सण शुक्रवारी (दि. 08) जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील असंख्य कोळी बांधव व महिलांनी एकत्र येत समुद्रकिनारी पूजा करून सायंकाळी सोन्याचा मुलामा असलेला नारळ समुद्राला अर्पण केला. समुद्राला शांत होण्याबरोबरच मासळी भरपूर मिळावी, असे आवाहन केले.
नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा अतिशय महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी विधीवत पूजा करून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते. रायगड जिल्ह्यात अलिबागसह अनेक भागात हा सण उत्साहात पार पडला. सकाळपासून कोळीवाड्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी नारळ फोडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. समुद्राला नैवेद्य देण्यासाठी महिलांनी नवनवीन पदार्थ तयार केले. सायंकाळी चारनंतर अलिबाग कोळीवाड्यासह आक्षी, नागाव, रेवस, मांडवा, मुरूड, श्रीवर्धन अशा अनेक कोळीवाड्यामधून मिरवणूक काढण्यात आली. कोळी गीतांच्या तालावर नाचत ही मिरवणूक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीसोबत डोक्यांवर कळश, पारंपारिक वेशभूषा करीत कोळी समाज सहभागी झाले होते. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक असे सर्वच मंडळी या मिरवणूकीमध्ये सहभागी झाले. समुद्रकिनारी मिरवणूक आल्यावर सर्वांनी समुद्राची विधीवत पूजा केली. कळशातील पाणी व सोन्याचा मुलामा असलेले नारळ समुद्राला अर्पण केले.







