| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षानगर डोंगराळ भागात असलेल्या जनकल्याण सोसायटीवर दरडीचा भाग कोसळला. या दरडीचा मलबा थेट एका घरावर जाऊन पडला. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबातील शालू मिश्रा (19) आणि सुरेश मिश्रा (50) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (45) आणि ऋतुराज मिश्रा (20) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्षानगरमधील हा डोंगराळ परिसर असून, दाट लोकवस्तीने भरलेला आहे. या भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे सतत होणाऱ्या अशा अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांच्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळेची संरक्षक भिंत कमकुवत झाल्यामुळे कोसळण्याची घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.दत्ता टेकडी परिसरातील रहिवासी संरक्षक भिंतीला लागूनच दुचाकी मागील अनेक वर्षांपासून पार्क करतात. मात्र, सतत पडत असलेल्या पावसामुळे अचानक मोठी संरक्षक भिंत कोसळून पाच ते सहा दुचाकीचे नुकसान झाले आहे.






