| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रविवार, दि. 17 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत जे.पी. नड्डा यांनी केली घोषणा केली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षांशीही संवाद साधू. उपराष्ट्रपतीपदासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी आम्हाला त्यांचा पाठिंबाही मिळाला पाहिजे. आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि आताही आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. आमच्या सर्व एनडीए मित्रपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदासाठी आमचे एनडीए उमेदवार आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबरला होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे.







