| धाटाव | प्रतिनिधी |
सलग दोन दिवस बरसणाऱ्या पावसामुळे औद्योगिक क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या तयारीअभावी ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचे चित्र होते. सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडत आहेत. विशेषत धाटाव औद्योगिक वसाहत आणि इतर काही ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. यामुळे उद्योगांना आणि कामगारांना ये-जा करण्यासाठी तसेच व्यवसायात अडचणी येत आहेत. पावसाचे योग्य नियोजन नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. अनेक ठिकाणी नालेसफाई हवी तशी झाली नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले, तर गटारे तुंबल्याने पाणी साचले आहे.
धाटाव औद्योगिक वसाहतीतील नीलिकॉन फूड डाइज कंपनीपासून एफ. डी.सी, नव्याने उभारलेली आयन एक्सचेंज, रोहा डाय केम, राठी डाय केम, बेक केमिकल यासह इतर कारखान्यातून पाणी साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही ठिकाणी कारची अर्धी चाके पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था फोल ठरल्याने रस्ते जलमय झाले.
औद्योगिक वसाहतील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची, कामगार वर्गाची तारांबळ उडताना दिसली. परिसरातील वाहतूक कमालीची संथ होऊन काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. खड्डे चुकवताना अवजड वाहनांची मोठी तारंबळ उडत होती.अनेक कारखान्यांच्या आवारातही रस्त्यावरील पाणी शिरल्याने उद्योजकांना मालवाहतूक करणे, कामगारांना कंपनीत जाणे, कंपनी आवारात वाहने उभी करणे अवघड झाले.
औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यांलगत विद्युत वाहक डिपी असल्याने साचलेल्या पाण्यामुळे शॉक लागण्याची भीती निर्माण झाली होती. तर बहुतांशी कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिये केंद्रातील पाणी हे पुराच्या पाण्यात मिश्रित झाल्यामुळे वेगवेगळ्या रंगाचे पाणी औद्योगिक वसाहतीमध्ये पसरलेले पहावयास मिळाले. गुडघावर पाण्यातून वाट काढत असताना काहीं कामगार वर्गाला या दूषित पाण्यामुळे सामोरे जावे लागले.नालेसफाईची ऐशी की तैशी झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले असल्याने कामगार वर्गाने मात्र चांगलाच संताप व्यक्त केला.







