| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊसास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पाणी साठणाऱ्या भागावरती अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज व सतर्क राहण्याचे आदेश तर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने 19 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जोरदार पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना चोवीस तास सतर्कता बाळगण्याच्या व परिस्थितीची पहाणी करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान पनवेलमधील बांठिया शाळेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून आयुक्त मंगेश चितळे व परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली. याच बरोबर कळंबोलीमध्येही प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली. तर उपायुक्त रवीकिरण घोडके, प्रभारी अधिक्षक रोशन माळी यांनी प्रभाग क्रमांक 17 पनवेलमध्ये नदी काठची पाहणी केली.
कळंबोलीमधील 20 ठिकाणी कोठेही पाणी साठणार याची काळजी महापालिकेच्यावतीने घेण्यात येत आहे. उपायुक्त रवीकिरण घोडके, अभिषेक पराडकर, सुबोध ठाणेकर व प्रभाग अधिक्षक दशरथ भंडारी यांच्या देखरेखीखाली पनवेल शहरातील कोळीवाडा भारत नगर झोपडपट्टी, पटेल मोहल्ल्यामधील 80 नागरिकांना कोळीवाडा शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. कोळीवाड्यातील 105 नागरिकांना उर्दु प्राथमिक शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
मुसळधार पाऊसात नागरिकांनी धोकादायक इमारतीमध्ये आसरा घेऊनये तसेच झाडे होर्डिंग्ज खाली उभारू नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता व काळजी घेण्यासाठी महापालिका तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. महापालिकेच्या सर्व विभागांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून अलर्ट मोडफ वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांनी महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
स्थलांतरितांना पालिकेकडून चहा, जेवण, आरोग्य सेवा व पाण्याची सोय पनवेल महानगरपालिकातर्फे करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने मदत सुरू करण्यात आली आहे. हवामान खात्याने मंगळवारी देखील रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे.
कैलास गावडे, उपायुक्त
आपत्ती व्यवस्थापन विभाग







