एसटी चालकाला केली मारहाण
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागहून सुडकोलीकडे जाणाऱ्या एसटीचा मार्ग अडवून शिंदे गटातील सुधीर चेरकर याने भर रस्त्यात चालकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी वावे नाका येथे घडली. एसटीतील चालकाच्या केबीनमध्ये घुसून हा प्रकार त्याने केला. गुंडगिरी करणाऱ्या सुधीर चेरकर विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापुर्वीदेखील त्याने एकाला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ भुरे असे या अन्यायग्रस्ताचे नाव आहे. हा इसम अलिबाग एसटी बस आगारात चालक म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून काम करीत आहे. मंगळवारी (दि.19) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एम.एच.20 बी.एल.3876 या क्रमांकाची एसटी बसमधून प्रवाशांना घेऊन सुडकोलीकडे सकाळी नऊ वाजता बस निघाली. सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वावे नाका येथे आल्यावर एम.एच. 06 सी. एल.0300 या सफेद रंगाच्या कारमुळे एसटी पुढे नेण्यास अडथळा निर्माण झाला. कारमधील चालक सुधीर चेरकर यांना गाडी बाजूला नेण्यास सांगितले. मात्र त्याने गाडी बाजूला न घेता एसटीच्या समोर कार आडवी घालून एसटीला पुढे जाण्याचा मार्ग अडविला. त्यानंतर कारमधून बाहेर येऊन त्याने एसटी चालकाच्या केबीनमध्ये घूसून चालकाला मारहाण केली. त्यामध्ये एसटी चालक जखमी झाला असून त्याला किरकोळ दुखापतही झाली आहे. रस्त्यात कार आडवी घालून एसटीचा जाण्याचा मार्ग अडवून चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सुधीर चेरकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईदेखील पोलिसांकडून करण्यात आली आहे.







