रायगडात कोट्यवधींचा बाजार ठप्प
| रायगड | प्रतिनिधी |
खराब हवामानामुळे गेल्या सहा दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील प्रमुख मच्छीमार बंदरातील मासेमारी बंद आहे. तर पुढील आणखी चार दिवसही धोक्याचे आहेत. त्यामुळे या बंदरातील जवळपास 100 कोटींच्या निर्यात व्यवसायावर परिणाम झाला आहे. या बंदरातून दिवसाला किमान सुमारे 10 कोटींच्या मासळीची उलाढाल होत होती. ती आज ठप्प झाली आहे. परिणामी, येत्या काळात मासळीची दरवाढीही होण्याची शक्यता आहे. एकीकडे डिझेल परतावा आणि दुसरीकडे वातावरणातील बदल यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधव हवालदिल झाले आहेत. कोट्यवधींची होणारी उलाढाल ठप्प झाली असून, परकीय चलनाच्या उद्दिष्टाला ब्रेक लागला आहे.
रायगड जिल्ह्यातील करंजा, अलिबाग, रेवदंडा, नवगाव, रेवस, एकदरा, राजपुरी, दिघी, जीवनाबंदर या बंदरांवर मासळीचे लिलाव केले जातात. या सर्व बंदरांच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठे मासळी निर्यातीचे हब रायगड जिल्ह्यात बनण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रात पकडलेल्या रिबन फिश, कटल, माकोल, नळ, कुपा, बांगडा आदी प्रकारच्या मासळीची निर्यात युरोप, थायलंड, व्हिएतनाम, हाँगकाँग, सिंगापूर, मिडल ईस्ट या जगातील विविध भागात पोहचली आहे. 15 ऑगस्ट 2024 पासून रायगड जिल्ह्यातील या प्रमुख बंदरातून मासळी विक्री सुरू झाली आहे. पहिल्या दोन महिन्यांच्या कालावधीत या बंदरातून 80 कोटींच्या 800 टन मासळीची निर्यात झाली होती. आता हा आकडा 800 कोटींच्या पार गेला असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे. ही मासळी अमेरिका, चीन, थायलंड तसेच आशिया व युरोप खंडातील अनेक देशांत निर्यात करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यातील विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या लघुउद्योगांत वाढ झाली आहे. त्यामुळे बंदरातील सुमारे 5 हजार मासेमारी बोटी व त्यावर आधारित 10 हजार कुटुंबांना लाभ झाला आहे.
यांत्रिक साहित्याला विदेशातून मागणी
मच्छिमारांच्या शेकडो बोटी मासळी उतरविणे, विक्रीसाठी मुंबईतील एकमेव ससून डॉक बंदराच्या आश्रयाला जात होत्या. त्यामुळे ससूनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊनच करंजा येथेच उपयुक्त जागेत सुमारे 300 कोटी खर्चाचे एक हजार मच्छिमार बोटी क्षमतेचे अद्यावत करंजा मच्छिमार बंदर उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धनचे जीवना बंदर आदी बंदरे अद्यावत करण्यावर भर देण्यात येत आहे. पारंपरिक मासेमारीबरोबर आता आधुनिक मासेमारीकडे कल वाढत आहे. या मच्छिमारांसाठी आवश्यक लागणारे साहित्य पुरविण्यासाठी जाळी, रंग, सामान पुरवठा करणारे हार्डवेअर, 20-25 वर्कशॉप्स, जाळींची दुकाने अद्यावत आहेत. परंतु या वस्तुंचे मोठे मार्केट मुंबईमध्येच आहे. रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी बोटी दुरूस्ती वर्कशॉप्समध्ये तयार करण्यात आल्या आहेत. या वर्कशॉप्समध्ये मच्छिमार बोटींसाठी लागणारे पंखे, टनट्युब, सॉफ्ट आदी यांत्रिक साहित्याला थेट विदेशातून मोठी मागणी आहे.






