| पनवेल | वार्ताहर |
सिडकोच्या घरांच्या मोहामुळे एका 41 वर्षीय महिलेची तब्बल साडेतीन लाखांची फसवणूक झाली आहे. सिडको अधिकारी असल्याचे भासवत राखीव कोट्यातून घर मिळवून देण्याचे आश्वासन देत एका व्यक्तीने ही लाखोंची लूट केली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पनवेल करंजाडे येथील आरोपीने स्वतःला सिडको अधिकारी असल्याचे भासवून मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात राहणाऱ्या महिलेशी ओळख केली. या महिलेचा विश्वास संपादन करत त्याने तिला रोडपाली येथील हंसध्वनी सोसायटीत नेले आणि येथील एक घर दाखवत घर मिळवून देतो असे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून पीडित महिलेने त्या व्यक्तीच्या बँक खात्यात तब्बल 3 लाख 55 हजार रुपये वर्ग केले. अनेक महिने उलटूनही घर न मिळाल्याने महिलेला फसवणूक केल्याचा संशय आला. याप्रकरणी तिने कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. संशयीत आरोपीला चौकशीसाठी बोलावूनही त्याने प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता फसवणूक टाळण्यासाठी जागरूक राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






