| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील गिरीस्थान नगरपरिषद असलेल्या माथेरान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2023 पासून प्रशासकीय राजवट असलेल्या माथेरान पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी माथेरानमध्ये 17 ऐवजी 20 सदस्य निवडले जाणार असल्याने माथेरानकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
माथेरान नगरपरिषद ब्रिटिश काळात स्थापन झाली असून गिरीस्थान नगरपरिषदेचा दर्जा असल्याने माथेरान पालिकेला राज्यस्तरावर महत्व आहे. माथेरान शहर कमी लोकवस्तीचे शहर असल्याने या ठिकाणी मतदारदेखील कमी असतात. सध्या 2011 च्या जनगणनेनुसार 4,393 लोकसंख्या असून अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या 623 तर अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या 183 आहे. त्यामुळे या प्रवर्गातून अनुक्रमे तीन व एक सदस्य निवडला जाणार आहे. नव्या रचनेत माथेरान पालिकेत दहा प्रभागामध्ये प्रत्येकी दोन असे 20 सदस्य निवडले जाणार असून त्यात सहा जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील दोन, अनुसूचित जमाती प्रवर्गातील एक, नागरिकांचा मागास प्रवर्गमधून तीन आणि सर्वसाधारण चार महिला यांच्यासाठी आरक्षण आहे. तर, सर्वसाधारण गटात सात जागा या खुल्या असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातील तीन महिला आरक्षित जागा वगळता अन्य दोन जागा खुल्या असणार आहेत. तर, थेट जनतेतून निवडून देणार असलेले नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या ही साधारण 430 ते 450 एवढी ठेवण्यात आली आहे.






