| कोर्लई | प्रतिनिधी |
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून, जिल्ह्याभरातील कोकणवासीय मोठ्या प्रमाणावर आपल्या गावाकडे येत असतात. मात्र, मुरूड तालुक्यातील साळाव-मुरुड रस्त्यावर विविध ठिकाणी असलेली उनाड गुरे गणेश भक्तांसह वाहन चालकांची डोकेदुखी ठरत आहे.
साळाव-मुरुड रस्त्यावर बोर्ली, ताराबंदर, बारशिव, काशिद, नांदगांव, मजगांव-पूल तसेच विहुर इत्यादी भागांत रस्त्यांवर उनाड गुरांचा हैदोस सुरू असतो. रात्रीच्या वेळी रस्त्यासह पुलावर ही उनाड गुरे ठिय्या मांडतात. त्यामुळे अनेक गणेश भक्तांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. या पूर्वी ग्रामपंचायतीत असलेली ‘कोंडवाडा’ हि संकल्पना संपुष्टात आल्यामुळे व संबंधित गुरांच्या मालकांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील उनाड गुरे वाहन चालकांची डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे यावर तातडीने ठोस उपाय योजना होणे अत्यंत गरजेचे असून काळाची गरज बनली आहे. यावर कोणतीही उपाय योजना न झाल्यास कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत, शासन व प्रशासनाने याप्रश्नी तातडीने लक्ष पुरवून, ठोस निर्णय घेऊन रस्त्यावरील उनाड गुरांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी गणेश भक्त, वाहनचालक व प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे.







