। नागोठणे। प्रतिनिधी।
अंबा नदीत वाहून गेलेल्या नागोठणे मोहल्ल्यातील 57 वर्षीय अनवर शेख यांचा मृतदेह सुमारे 50 तासानंतर सापडला आहे. अनवर शेख यांचा मृतदेह अंबा नदीच्या खाडीत सांबरी गावच्या पकटी जवळ असल्याची माहिती नागोठण्याच्या निसर्ग वन्यजीव संरक्षण संस्था रायगड यांच्या नागोठणे टीमला मिळाली होती. त्यानंतर या टीमने सांबरी पकटी येथे जाऊन अनवर यांचा मृतदेह छोट्या होडीत टाकून नागोठण्यात आणला. अनवर यांचा मृतदेह पाहताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
शनिवारी (दि. 23) रोजी नागोठण्यातील जुन्या पुलावरून पाय घसरून पडल्याने अनवर हे अंबा नदीच्या पात्रात वाहून गेले होते. अंबा नदीच्या पात्रात अनवर शेख यांची शोध मोहीम सह्याद्री वन्यजीव संरक्षण संस्थेच्या टीम कडून शनिवारी संध्याकाळपर्यंत राबविण्यात आली होती. मात्र, अनवर शेख सापडले नव्हते. दरम्यान निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड यांच्या नागोठणे टीमकडून अनवर शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या या टीम मध्ये एन व्ही आर एस एस संस्थेचे नागोठणे अध्यक्ष प्रथमेश कोळी, सदस्य प्रणाल शिर्के, वसंत डोलकर, नवनीत मोकल, साहिल राणे, सनिस मिणमिणे, रोहित पाटील, स्वागत पारंगे, विनय पारंगे, कल्पेश बडे, नीरज बडे, अखिल शेलार यांचा समावेश होता.







