| अलिबाग | प्रतिनिधी |
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्याची लगबग वाढली आहे. चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणाकडे निघाले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी आधुनिकेतचा आधार घेतला आहे. वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात खारपाडा आणि पाली या ठिकाणी दोन एआय सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेरांच्या मदतीने वाहनांच्या संख्येवर लक्ष ठेवून वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी दिली.
गणरायाचे आगमन बुधवारी (दि.27) होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी आणि सजावटीसाठी चाकरमानी कोकणात निघाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 226 एसटी बसेस मुंंबई व ठाणे येथील चाकरमान्यांना घेऊन कोकणात निघाल्या आहेत. तसेच, काही गणेशभक्त खासगी वाहनांने निघाले आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून रायगड पोलिसांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब केला आहे. खारपाडा व पाली या ठिकाणी दोन एआय सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेरांच्या मदतीने मुंबई मार्गाने येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर नजर ठेवली जाणार आहे. त्यानुसार पुढील प्रवासात असलेल्या भक्तांना प्रवासात अडथळा होऊ नये, यासाठी नियोजन केले जाणार असल्याची माहिती अभिजीत भुजबळ यांनी दिली.







