भोईर दांपत्याचे सामाजिक मिशन
व्यवसायासाठी मशीनसह भांवडलही केले उपलब्ध
। पेण । वार्ताहर ।
भोईर दांपत्याच्या सामाजिक मिशनमुळे शिहू परिसरातील महिला वर्गाची दिवाळी प्रकाशमान झाली आहे. महिलांना सामाजिक तथा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमाद्वारे, परिसरातील करकरणी माता महिला बचत गटाला पापड बनविण्याचे ऑटो मशीन मिळवून देण्यासोबत, त्याकरीता लागणारे भांडवलदेखील भोईर दांपत्याने स्वतःच्या खिशातून उपलब्ध केले आहे.
महिला सबलीकरण हा सामाजिक क्षेत्रातील परवलीचा शब्द असून सर्वच स्तरीय संस्था तसेच व्यक्ती यांच्याकडून त्यांचा वापर होतो. पण, त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे दुर्मिळ असतात. फक्त चर्चा किंवा विकासाच्या पोकळ गप्पांपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे आणि सामाजिक आत्मियेतेने काम करणारे भोईर दांपत्यही सर्वांगीण विकासावर लक्ष देत कार्यरत आहे. गृपग्रामपंचायत शिहूच्या सरपंच पल्लवी भोईर आणि युवा नेते प्रसाद भोईर या दापंत्याचे राजकारण सदैवच समाजकल्याणाचे मिशन म्हणून राबविण्यात येते.
महिला सबलीकरणाचा एक भाग म्हणून आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे असून त्याकरिता विविध बचत गटांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भोईर दांपत्याने, जिल्हा परिषदेद्वारे, शिहू येथील करकरणी महिला बचत गटाला पापड बनविण्याचे ऑटो मशीन मिळवून दिले. या मशीनचे उद्घाटन लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून पंचायत समिती, पेणच्या सभापती मनिषा भोईर, युवा नेते प्रसाद भोईर, माजी सभापती संजय भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसाद भोईर म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी बचत गट ही प्रायोगिक तत्त्वावरील सुरूवात असून परिसरातील विविध बचत गटांनी, वेगवेगळ्या संकल्पनांच्या आधारे व्यवसाय करत पुढे जावे. या गटांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय, महिला बचत गटांनी अत्यंत मेहनतीने व आधुनिक पध्दतीने, मार्केटिंग, फायनान्स अशा सगळया घटकांचा शास्त्रशुध्द अभ्यास करत व्यवसाय करण्याचेही त्यांनी सुचित केले.
या कार्यक्रमास माजी सरपंच विश्वास मोकल, माजी उपसरपंच सुजित गदमळे, ज्येष्ठ कार्यकर्त्ये नामदेव म्हात्रे, नरेश म्हात्रे आदि मान्यवर तथा महिला बचत गटाच्या सदस्या शिल्पा भोईर, गिता अडसूळे-भोईर, योगिता म्हात्रे, वैशाली म्हात्रे, देवयानी म्हात्रे, विठाबाई म्हात्रे, शलाका म्हात्रे आदि महिला उपस्थित होत्या.