यशोधन सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
| अलिबाग | प्रतिनिधी |
यशोधन सहकारी पतसंस्थेला तब्बल 44 लाखांचा नफा मिळाला आहे. हा नफा फक्त आकड्यांचा नाही, तर आपल्या एकतेचा विजय आहे. सभासदांचा विश्वास हीच खरी ताकद आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये संस्थेला तब्बल 44 लाख 45 हजारांचा निव्वळ नफा झाला असून, मागील शिल्लक धरून संस्थेकडे एकूण 44 लाख 49 हजार रुपये शिल्लक राहिल्याची माहिती यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर वागळे यांनी दिली. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्यावेळी ते बोलत होते.
शेखर वागळे म्हणाले की, ठेवींच्या बाबतीतही संस्थेने मोठी झेप घेतली आहे. गतवर्षीच्या 12 कोटी 9 लाख रुपयांच्या तुलनेत यावर्षी ठेवी वाढून थेट 13 कोटी 6 लाखांवर पोहोचल्या आहेत. म्हणजेच तब्बल 97 लाख रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. हा आकडा माझा नसून तो सभासदांच्या विश्वासाचा आहे, असे वागळे यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमात संस्थेचे ऑडिटर संदीप गोठीवरेकर यांनी संस्थेचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असून, ठेवीदारांचे पैसे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. कायदेशीर सल्लागार ॲड. किरण कोसमकर यांनीही संस्थेच्या प्रगतीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी डिजिटल अरेस्ट, हनी ट्रॅप आणि सायबर क्राईमविषयक जनजागृती केली. नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात काम करणारे दादा क्लासेसचे दादा वारीसे व मारोती भगत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पदाधिकारी, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







