पुलाचा काही भाग, रस्त्याची साईडपट्टी कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद
। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी गावाच्या नजीकचा मुख्य रस्त्यावरील छोटा साकव कोसळला आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता ही घटना घडली. सुदैवाने पुलानजीकचा रस्ता खचताना आणि पुलाचा भाग पडताना कोणतेही लहान वाहन तेथून गेले नाही. अन्यथा दुर्घटना घडली असती.
नांगरवाडी ग्रामस्थांनी तातडीने कोसळलेल्या ठिकाणी जाऊन रस्ता बंद केला आहे. ग्रामस्थांनी रेवदंडा पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली आहे. सकाळपासून अजूनही हळूहळू या पुलाचा भाग आणि रस्त्याच्या साइडपट्टीची माती ढासळत आहे. यावरून एखादे चारचाकी वाहन गेले तर पूल पूर्णतः कोसळण्याची शक्यता आहे. हा छोटा साकव कोसळल्याने आता या रस्त्यावरून लहान चारचाकी आणि दुचाकी वाहनांची वर्दळ थांबणार असून नागरिकांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, रोहा रस्त्यावरील नवघर आणि सुडकोली येथील दोन पूल धोकादायक असल्याने यावरून अवजड वाहतूक बंद केली आहे. यामुळे नागरिकांची हेळसांड होत होती. आता नांगरवाडी नजीकचा पूल दुर्घटनाग्रस्त झाल्याने अन्य वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे.







