। मुंबई । प्रतिनिधी ।
विरारमधील चार मजली इमारतीचा भाग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. इमारत दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास आता विरार पोलिसांकडून गुन्हे शाखा कक्षा 3 कडे सोपविण्यात आला आहे. विरार पोलिसांनी बुधवारी इमारत विकासाला अटक केल्यानंतर शुक्रवारी भागीदार असलेल्या आणि जमीनमालक असलेल्या इतर चार जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
विरारच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळून मंगळवारी मध्यरात्री दुर्घटना घडली होती. यामध्ये 17 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. रमाबाई अपार्टमेंट ही इमारत पालिकेची कोणतीही परवानगी न देता अनधिकृतपणे बांधण्यात आल्याने या प्रकरणी पालिकेने तक्रार दिल्यानंतर विरार पोलिसांनी तात्काळ विकासकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखा कक्षा 3 कडे सोपविण्यात आला. नितल साने (48) असे अटक केलेल्या विकासकाचे नाव असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आहे. या तपासादरम्यान पोलिसांना या इमारतीमध्ये दळवी कुटुंब भागीदार असल्याचे समोर आले.
दळवी कुटुंबातील मूळ मालक याचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर ती जमीन आता त्याच्या दोन मुली आणि जावई यांच्या नावावर आहे. त्यामुळे भागीदारी करत रमाबाई अपार्टमेंटमधील 54 फ्लॅट्स आणि 6 दुकानांपैकी 32 फ्लॅट आणि 3 दुकाने ही साने याच्या मालकीची होती आणि 22 फ्लॅट, 3 दुकाने ही दळवी कुटुंबातील दोन मुलींच्या नावे होती. त्यातील 11 सदनिका या अजूनही दळवी यांच्या दोन मुली यांच्या नावावर आहेत.
सर्व फ्लॅट्स साने किंवा दळवी यांनी नोटरी पद्धतीने रहिवाशांना विकल्याचे समोर आल्याने गुन्हे शाखा कक्ष 3 यांनी याप्रकरणी दळवी कुटुंबातील 2 मुली शुभांगी भोईर (38), संध्या पाटील (35) तसेच, जावई सुरेंद्र भोईऱ (46) आणि मंगेश पाटील (35) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर विकासक नीतल साने याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी दिली.





