। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ शहरातील राजेंद्र गुरुनगर येथील अंबिका अपार्टमेंट इमारतीत चोरीची घटना घडली आहे. गणेश संनगरे यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात झालेल्या या चोरीत तब्बल 7 तोळे सोने व 6 लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य मंगळवारी (दि. 2) सकाळी दहा वाजता गणेश दर्शनासाठी बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरच्या दाराचे कुलूप फोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडले. यामधून दोन गंठण, कानातले, चैन, ब्रेसलेट, अंगठी अशा दागिन्यांसह रोकड असा ऐवज चोरून नेला. चोरीसाठी वापरलेला लोखंडी रॉड इमारतीच्या जिन्याच्या कोपऱ्यात काही अंतरावर पोलिसांना आढळून आला आहे. चोरीची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तत्काळ चार शोधपथके तयार केली आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पाहणी केली. यावेळी ढवळे यांनी सांगितले की, “चोरांचा शोध घेण्यासाठी चार पथके कार्यरत असून, डॉग स्कॉड देखील घटनास्थळी बोलावण्यात येणार आहे. नेरळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







