जिल्ह्यात 15 ग्रामस्तरीय प्रयोगशाळा
| रायगड | प्रतिनिधी |
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम 2025-26 मध्ये ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्हा कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण थेट गावातच करता येणार असून, वेळ आणि खर्चदेखील वाचणार आहे.
माती परीक्षण म्हणजे मातीचा रासायनिक व सेंद्रिय पदार्थांचा अभ्यास करणे. हे शेतीमध्ये पीक उत्पादन वाढवण्यासाठी, योग्य पिकांची निवड करण्यासाठी, खतांचा योग्य वापर करून खर्च कमी करण्यासाठी, मातीची सुपीकता सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी केले जाते. प्रयोगशाळा चालविण्याची संधी कृषी चिकित्सालय, कृषी व व्यवसाय केंद्र, माजी सैनिक, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, निविष्ठा विक्रेते, बचत गट तसेच शालेय व महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अर्ज करता ययेणार आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षे हवे. किमान शैक्षणिक पात्रता दहावी (विज्ञानासह) उत्तीर्ण, एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आवश्यक, प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी स्वतःकडे चार वर्षापेक्षा जुन्या नसलेल्या इमारतीचा ताबा असणे, आधार कार्ड आवश्यक आहे. पाच लाख रुपये अनुदान शासनाकडून प्रत्येक प्रयोगशाळेसाठी दिले जाणार आहे. हा निधी आवश्यक उपकरणे, साहित्य आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत. जिल्ह्यात 15 ग्रामस्तरीय मृद नमुना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरिता जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केला आहे.
अर्ज जास्त असल्यास सोडत काढणार
जर प्राप्त अर्जाची संख्या निश्चित लक्षांकापेक्षा जास्त असेल, तर जिल्हास्तरीय निवड समितीकडून पारदर्शक सोडत प्रक्रिया राबवून अर्जदारांची निवड केली जाईल.







