गर्दी वाढल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
| मुंबई | प्रतिनिधी |
दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जनकरुन मुंबईकडे निघालेल्या गणेशभक्तांचे परतीच्या प्रवासात मोठे हाल झाले. चार ते पाच तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना वातानुकूलित गाडीमध्येही घाम फुटला. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. परंतु, एकाच मार्गिकेमुळे आणि दररोज धावणाऱ्या 40 ते 45 गाड्यांमुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पळस्पे ते नागोठणेपर्यंत रुंदीकरण होऊनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरचा वाहतूक कोंडीचा विळखा दूर होत नाही. दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देऊन चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघाले. चाकरमानी आणि प्रवासी त्यांची चारचाकी, दुचाकी वाहने, खासगी प्रवासी वाहने, एसटी बसेस व अवजड मालवाहू वाहनांची तुफान गर्दीच महामार्गावर असून, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. चार-पाच तास गाडीत बसून राहावे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. या वाहतूक कोंडीत ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांचे हाल झाले. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचे तीनतेराच वाजले होते. वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून येत होते.
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर दुहेरी मार्गिका नसल्यामुळे गाड्यांना अनेक ठिकाणी थांबवून दुसऱ्या गाड्यांना मार्ग द्यावा लागत आहे. विशेषतः तामिळनाडू, केरळ, गुजरात, दिल्ली, राजस्थान, पंजाब यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. याचा थेट परिणाम कोकणातील गणेशभक्तांसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांवर होत आहे. या गाड्यांना अनेक लहान स्थानकांवर थांबवून ठेवावे लागत असल्याने त्या अनेक तास उशिराने धावत आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या 362 विशेष फेऱ्यांमुळे प्रवाशांची सोय झाली असली तरी, परतीच्या प्रवासातील हालअपेष्टांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, आणि सिंधुदुर्गनगरी यांसारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. रात्रीच्या वेळी सुटणाऱ्या गाड्या अनेक तास उशिराने येत असल्यामुळे प्रवाशांना स्थानकावर जागा मिळत नाही आणि त्यांना रात्री खोळंबून राहावे लागत आहे. काही गाड्या तर मध्यरात्री 1 ते 2 वाजता सुटत आहेत.
खासगी बसकडून लूट
रेल्वेत आरक्षित सीट मिळत नसल्याने तसेच बसेसला गर्दी वाढल्याने कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांना आता केवळ खासगी बसचाच आधार आहे. त्यामुळे खासगी बसेसच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच फायदा घेऊन आता खासगी बसचालकांनी मोठी भाडेवाढ केल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवाशांवर निर्धारित भाड्यापेक्षा दुप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे.
प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने त्रास
अनेक स्थानकांवर शेड नसल्याने प्रवाशांना भिजत गाडी पकडावी लागत आहे. गाडीची घोषणा झाल्यानंतर ती गाडी येईपर्यंत प्लॅटफॉर्मवर सामान सांभाळत गाडीची वाट पाहावी लागत आहे. मुसळधार पावसात दोन्ही हातात सामान घेऊन भिजत भिजत गाडी पकडावी लागत आहे.
प्रवास वेटिंगवरच
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे कन्फर्म तिकीट भेटणे म्हणजे एक दिव्यच मानावे लागेल, अशी परिस्थिती सध्या आहे. कोटा कमी, त्यात दलालांचा सुळसुळात त्यामुळे सामान्य प्रवाशांना सहजासहजी आरक्षित तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा परतीचा प्रवस त्यांना सामान्य कोचमध्ये करावा लागत आहे.
लालपरीसुद्धा अपुरी
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने कोकणवासियांनी परतीच्या प्रवासासाठी लालपरीला पसंती दिल्याचे दिसून आले. परंतु, अचानक एसटी बसेसला गर्दी वाढल्याने त्यादेखील प्रवाशांसाठी अपुऱ्या पडत आहेत. त्यातच महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटीमधील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.








