| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईकरांचा लोकल प्रवास आता आणखी आरामदायी आणि आधुनिक होणार आहे. मुंबई रेल्वे विकास निगमने तब्बल 2,856 पूर्णपणे वातानुकूलित वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदीसाठी मोठी निविदा जाहीर केली आहे. हे डब्बे 12, 15 आणि 18 डब्यांच्या रॅक स्वरूपात धावणार असून, गर्दी कमी करण्यासोबतच प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.
सध्या बहुतेक लोकल 12 डब्यांच्या असल्या तरी काही गाड्या 15 डब्यांच्या आहेत. वाढत्या प्रवाशांच्या मागणीला लक्षात घेऊन या नव्या खरेदीत 15 डब्यांच्या गाड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, तसेच आवश्यकतेनुसार 18 डब्यांचे रॅकही आणले जाणार आहेत. एमयूटीपी टप्पा 3 व 3ए अंतर्गत 6 सप्टेंबर रोजी ही निविदा जाहीर झाली. या अंतर्गत केवळ डबे खरेदीच नाही तर पुढील 35 वर्षे त्यांची देखभाल करण्याचाही समावेश आहे. यासाठी भीवपुरी (मध्य रेल्वे) व वाणगाव (पश्चिम रेल्वे) येथे दोन अत्याधुनिक डेपो उभारले जाणार आहेत. निविदा सादरीकरण 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून 22 डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. हा प्रकल्प मेक इन इंडिया धोरणानुसार राबवला जाणार असल्याने देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार आहे. करारानंतर दोन वर्षांत पहिला प्रोटोटाइप रॅक मुंबईत दाखल होणार आहे.






