| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 22 एकरावर पसरलेला असून 40 फूट भिंतींनी वेढलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करित असतात. हा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात शासनाकडून किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात. यामुळे या पावसाळी तीन महिन्यांत किल्ल्याच्या आतील आजूबाजूला भिंतीवर 5 ते 6 फूट उंचीने झाडे व गवत वाढल्याने या ठिकाणी सरपटणारे जनावरे असू शकतात. यापासून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने पुरातत्व विभागाने किल्ल्याचे दरवाजे काही दिवस बंद ठेवून चारही बाजूंनी कामगारांनी साफसफाईला सुरुवात केली आहे. लवकरात लवकर किल्ला सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करणार असल्याची माहिती सहायक संवर्धक पुरातत्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.







