| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल जेएनपीटी महामार्गावरील कंटेनर यार्डमध्ये गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या चोऱ्या झाल्या असून तब्बल साडेआठ लाख रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे. रात्रीच्यावेळी तोंडाला कापड बांधून चोरटे कंटेनर यार्डमध्ये शिरून या चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सलग दोन दिवस महामार्गावरील कंटेनर यार्डमधील मालाच्या सुरक्षेबाबत व्यापारीवर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
पनवेल जेएनपीटी महामार्गावरील कंटेनरयार्ड हे रस्त्यालगत असल्याने चोरट्यांचे फावले आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी व रविवारी या दोन रात्रींमध्ये झालेल्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. या चोरीची पहिली घटना शनिवारी रात्रीच्या सूमारास बंबावीपाडा येथील ईरा लॉजिस्टिक येथील एरनॉरीस कंटेनर लाईन्स या कंपनीचे कार्यालयाचे प्रवेशव्दार तोडून चोरटे आत शिरले. कार्यालयातील रोख रक्कम आणि डिझेलने भरलेले पिंप या चोरट्यांनी चोरले. या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने याबाबत पनवेल शहर पोलिसांना कळविल्यावर 6 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. तसेच दुसरी घटना रविवारी रात्री घडली. गव्हाण फाट्यावरून उरणकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकीच्या हाकेच्या अंतरावर ए टेक या कंटेनर यार्डमध्ये चोरी झाल्याचे 42 वर्षीय रखवालदाराने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कंटेनर यार्डमध्ये राजरोस शिरून चोरी करण्याचे सत्र सुरू झाल्याने येथील व्यापारी धास्तावले आहेत. यापूर्वी रात्रीच्यावेळी रस्त्यावर उभे असणाऱ्या जड अवजड वाहनांमधून डिझेल व टायर चोरीचे प्रकार सतत घडत होते. त्यामुळे वाहनमालक व चालक वैतागले होते. रात्रीच्यावेळी रस्त्याकडेला उभे असणाऱ्या वाहनाच्या काचा फोडून त्यामधील मोबाईल व इतर वस्तू चोरी करण्याच्या घटना या परिसरात घडत होत्या.






