इमारत तयार होऊनही सोयी सुविधांचा अभाव
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळजवळील जिते येथे आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, इमारतीत कोणत्या प्रकारच्या दवाखान्याची आहे. याबाबत मागील दीड वर्षांपासून कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती नाही. जिते गावाच्या बाहेर नवीन आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आले असून दीड इमारत बांधकाम होऊन आजपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्य खात्याचा कारभार नक्की कोणत्या दिशेने चालला आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी स्वीकृत सदस्य राजेश जाधव यांनी या ठिकाणी तत्काळ दवाखाना सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात साधारण 30 हजार लोकसंख्यागृहात धरली जाते, त्यानुसार ठरलेल्या पॅटर्ननुसार तालुक्यात नेरळ, कळंब, आंबिवली, खांडस, कडाव आणि मोहाली अशा सहा ठिकाणी आरोग्य केंद्र आहेत. मात्र त्यापैकी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या साधारण 80 हजाराच्या घरात आहे. त्यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कामाचा मोठा दबाव असतो. त्यात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ रेल्वे स्थानक आणि एसटी स्थानकाच्या जवळ हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे रुग्णानाची संख्या या ठिकाणी जास्त असते. तसेच दिवसभर रुग्णांची वर्दळ असते. त्यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे अशी मागणी सातत्याने केली जात असते. त्यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे विभाजन करून दोन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावेत अशी मागणीदेखील पुढे आली आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला असून त्या आरोग्य केंद्राच्या इमारतीमधून कोणत्याही प्रकारचा कारभार किंवा आत्या इमारतीचा कोणत्याही प्रकारे वापर केला जात नाही.
शासनाच्या पॉलिसीप्रमाणे कोणत्याही नवीन आरोग्य केंद्र किंवा आरोग्य उप केंद्र यांच्या उभारणीमध्ये जागेची उपलबद्धता झाल्यानंतर इमारत बांधकाम केले जाते. त्यानंतर आरोग्य संचालक यांच्याकडून पाहणी झाल्यावर आरोग्य केंद्राची मंजुरी दिली जाते. इमारत बांधून पूर्ण झाली असून आरोग्य उप संचालक यांच्याकडून लवकरच तेथे कोणत्या प्रकारचा दवाखाना होणार हे जाहीर केले जाईल.
– डॉ. नितीन गुरव
तालुका आरोग्य अधिकारी
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीजवळ चारचाकी वाहन घेऊन जाणे म्हणजे मोठे कष्टाचे काम आहे. त्या ठिकाणी वाहने जाण्यास रस्ता अरुंद आहे, म्हणून जिते येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधली आहे. परंतु सव्वा दोन कोटी खर्चून बांधलेल्या इमारतीमध्ये रुग्णसेवा देण्यास सुरुवात व्हावी, अशी मागणी आहे.
– राजेश जाधव, माजी स्वीकृत सदस्य रायगड जिल्हा परिषद







