रायगड जिल्ह्यातील 447 नागरिकांमध्ये जनजागृती
| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |
मोबाईलच्या जगतामध्ये नागरिक एकमेकांपासून जवळ आला असला, तरीही एकमेकांचे संवाद कमी झाले आहे. विभक्त कुटूंब पध्दतीमुळे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कारणामुळे नैराश्य निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. नैराश्यपोटी आत्महत्या करणाऱ्यांना समुपदेशनाचा आधार मिळाला आहे. 2022 पासून आतापर्यंत 447 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास आरोग्य विभागाला यश आले आहे.
शारिरीक आजार हे सहज दिसून येणारे असतात. त्यावर उपचारही वेळेवर करता येतो. परंतु मानसिक आजार दिसून येत नाही. नैराश्याने अनेक जण जीवन संपविण्याचा प्रयत्न करतात. आत्महत्या हा एक क्षणाचा निर्णय आहे. मात्र त्यामुळे कुटूंबाची खुप मोठी हानी होते. मानसिक आजारावर उपचार म्हणजे आपण बोलके होणे आवश्यक आहे. व्यक्त होणे गरजेचे आहे.बदलत्या राहणीमानामुळे मनमोकळेपणाने संवाद करणे थांबले आहे. त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. नैराश्य हा मानसिक आजार आहे. मनाने खचून जाऊन अनेकजण आत्महत्या करणाऱ्यावर भर देतात. त्यात काहीजण फॉरेटसह फिनेलसारखे विषारी पदार्थ खाणे व पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न अधिक करतात. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील मंडळीची संख्या अधिक असते.
रायगड जिल्ह्यामध्ये 2022 2025 या कालावधीत 447 जणांनी नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुषांपेक्षा महिलांच्या संख्येत प्रचंड वाढ असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांमार्फत योग्य उपचार, आणि समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे 447 लोकांचे प्राण वाचविण्यास त्यांना यश आले. त्यामध्ये 195 पुरुष व 252 महिलांचा समावेश आहे. समुपदेशनाचा आधार आत्महत्या करणाऱ्यांना मिळाला आहे.
जिल्ह्यात आत्महत्या प्रतिबंधक सप्ताह सुरु
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन व आत्महत्या प्रतिबंध सप्ताह 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत सुुरू केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात 15 ते 29 या वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये आत्महत्येने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच या वयोगटातील लोकांना मानसिक आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी पुढील आठवड्यात अलिबाग शहरातील महाविद्यालयात चर्चासत्र व व्याख्याने घेण्यात येणार आहेत. चिंता, ताणतणाव व नैराश्य हे मानसिक आजार या विषयांवर चर्चा होणार आहे. आत्महत्या न करण्याचा संदेश वेगवेगळ्या फलकांमार्फत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांना माहितीपर पत्रके वाटून मंगळवारी (दि.16) सप्ताहाची सांगता होणार आहे. जिल्हा रूग्णालयातील ओपीडी नंबर 22 येथे मानसोपचार विभागात समुपदेशन व मानसोपचार सुविधा उपलब्ध आहेत याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.







