चार अग्निबंबांसह 55 मीटरची शिडी लवकरच होणार दाखल
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेच्या हद्दीतील अग्निशमन यंत्रणेची सुधारणा करण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध पावले उचलली आहेत. सध्या महापालिकेकडे तीन अग्निशमन केंद्रे आहेत, परंतु वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार आणि नवीन गृहप्रकल्प उभारणीच्या पार्श्वभूमीवर खांदेश्वर स्थानकाजवळ नवीन अद्ययावत अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय चार नवीन अग्निबंब आणि 55 मीटर उंचीची शिडी लवकरच महापालिकेकडे दाखल होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या स्थापनेपूर्वी येथे एकच अग्निशमन केंद्र होते. नंतर सिडको वसाहतींचे हस्तांतरण पालिकेकडे झाल्यानंतर नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रही पालिकेकडे आले. सद्यः स्थितीत पालिकेकडे तीन केंद्रे असून, 135 कर्मचारी अग्निशमन यंत्रणेच्या कार्यासाठी तैनात आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या कामांमुळे कामोठे, कळंबोली, तळोजा, रोहिंजन, घोटगाव, नावडे आणि खारघर परिसरात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. यामुळे भविष्यात आग प्रतिबंधक यंत्रणांची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे आहे. खांदेश्वर स्थानकाजवळील नवीन केंद्र उभारून या भागातील नागरिकांना तत्काळ अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. सिडकोने उभारलेली नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रे सुमारे 40 वर्षे जुनी आहेत. या केंद्रांच्या इमारत जीर्ण झाल्याने नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.







