| पनवेल | वार्ताहर |
सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगून कुलाबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यात अरेस्ट करत आहोत असे सांगून 26 लाख 6 हजार आठशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश मिश्रा आणि विक्रांत सिंग राजपूत यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शशांक शेखर दासरॉय हे कोप्रोली, कोणार्क रिवर सोसायटी येथे राहत असून, ते सेवानिवृत्त आहेत. त्यांना व्हिडीओ कॉल आला आणि सीबीआय ऑफिसर, कुलाबा पोलीस ठाणे अशी ओळख सांगून फसवणुकीच्या गुन्ह्यात हाऊस अरेस्ट करण्यात येत आहे असे सांगितले. व्हिडीओ कॉल कट केला तर कधीही पोलीस घरी येतील असे सांगितले. त्यानंतर विक्रांत सिंग असे नाव सांगून मी प्रोफाईल फोटो बदलत आहे असे सांगितले. तुम्ही गुन्ह्यातील मुख्य संशयित असल्याचे सांगून मनी लॉन्ड्रिग आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती दिली. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे 1 चिन्ह असलेले दोन लेटर हेड असलेले लेटर पाठवून तुम्हाला सुद्धा अटक होऊ शकते, असे बोलून त्यांनी पोलिसांसोबत आरोपीचे फोटो असलेले तीन फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले. माझे नाव या प्रकरणातून कसे काढता येईल, अशी विनंती शशांक यांनी केली असता त्यांनी बँक खात्याची माहिती देण्यासाठी विचारणा केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 26 लाख 6 हजार आठशे रुपये पाठवले. त्या क्रमांकावर संपर्क साधून झालेल्या केस बाबत विचारणा केली असता संपर्क झाला नाही. याची माहिती त्यांनी त्यांच्या मुलाला दिली. यावेळी मोबाईल चेक करून पाहिले असता फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले.







