| माथेरान | वार्ताहर |
पर्यटकांचे आकर्षण व माथेरानची खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ माथेरान मिनीट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबरचा मुहूर्त साधणार का? याची चर्चा सर्वत्र होत असून मागील काही वर्षांमध्ये नेरळ माथेरान मिनीट्रेन सुरू होण्याकरिता दिरंगाई होत असल्याच्या कारणांनी यावर्षी तरी ही ट्रेन वेळेवर सुरू होईल का? अशा शंका माथेरानमधील स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहे.
माथेरान पर्यटन नगरीचे मुख्य आकर्षण असलेले मिनी ट्रेन सफारी पर्यटकांकरिता एक मेजवानी असते या ट्रेनने नागमोडी वळणे व डोंगर रांगांमधून प्रवास करण्याकरता देश-विदेशातून अनेक पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असतात. परंतु, पावसाळ्यामध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद ठेवण्यात येते, परंतु यावेळी अमन लॉज ते माथेरान शटल सेवा मात्र नियमित सुरू असते.
पर्यटकांना खरे आकर्षण हे नेरळ माथेरान या सफारी मध्येच वाटत असल्याने यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ व्हावी, अशी सातत्याने मागणी होत असते. परंतु, रेल्वे प्रशासन मागील काही वर्षापासून त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव 15 जूनला मिनीट्रेन बंद होत असते परंतु मागील दोन-तीन वर्षांमध्ये रेल्वे प्रशासन या अगोदरच मिनीट्रेन बंद करण्याची घाई करत आल्याचे चित्र आहे. परंतु, मिनिट्रेन सुरू करण्यासाठी मात्र नेहमीच उशीर होत असतो हे लक्षात घेता यावर्षी तरी मिनीट्रेन वेळेवर सुरू होणार का असा प्रश्न येथील स्थानिक विचारत आहे. काही वर्षांपूर्वी माथेरानमध्ये नेरळहुन मिनीट्रेनच्या पाच फेऱ्या सुरू होत्या. पण यावेळेस फक्त दोनच फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. लवकरच त्या वाढविण्यात येतील असे सांगितले होते; परंतु नेहमीप्रमाणे ही पोकळ आश्वासन ठरली होती. त्यामुळे यावर्षी तरी मिनी ट्रेनला गत वैभव प्राप्त होताना नेरळ माथेरान फेऱ्यांमध्ये वाढ होणार का अशी मागणी माथेरानकरांकडून होत आहे, तर नेरळ माथेरान मार्गावरती मिनीट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यास रेल्वे प्रशासन अनुत्सुक असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
नेरळ-माथेरान सेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रशासनाने सुरू करून नेरळ माथेरान सेवेमध्ये वाढ करावी व पूर्वीप्रमाणे येथे वस्तीला येणारी मिनीट्रेन व मालवाहू गाडी पुन्हा सुरू करावी.
प्रदीप घावरे,
माजी नगरसेवक







