भूमीपुत्रांचा निर्धार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे सप्टेंबरअखेरपर्यंत विमान उड्डाणाच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे मात्र नामकरणाबाबत सरकारकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. जर विमानतळाला दि.बां.चे नाव देण्याचा निर्णय घेतला नाही, तर विमानतळावरुन एकाही विमानाचे उड्डाण होऊ देणार नाही, असा निर्धार भूमीपुत्रांनी केला आहे.
‘विमानतळ दि.बा. पाटील यांच्या नावानेच हवा’, अशा घोषणा देत रविवारी (दि. 14) भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली भिवंडीहून जासईपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी दि.बांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या समर्थकांनी गगनभेदी घोषणा देत आसमंत दुमदुमून सोडला होता.
रॅलीची सुरुवात सकाळी 9 वाजता मानकोली, भिवंडी येथून झाली. कळवा, ऐरोली, रबाळे, नेरुळ, सानपाडा, नवी मुंबई पालिका मुख्यालय, रेतीबंदर गेट अशा मार्गाने जात ही रॅली जासई गावात पोहोचली. जासई येथे आयोजित अभिवादन सभेत दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुमारे दोन हजारांहून अधिक वाहनांचा या रॅलीत सहभाग होता. स्थानिक भूमीपुत्र, आगरी-कोळी समाज, विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीला हजेरी लावली. रॅलीदरम्यान ‘विमानतळ दि.बा. पाटील यांच्या नावानेच हवा’, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले, “स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.” नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात येत नाही, तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशाराही खासदार सुरेश म्हात्रे यांनी थेट केंद्र सरकारला दिला. दि.बा. पाटील यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
नेपाळसारखी क्रांती घडवू
दि.बा. पाटील यांना अभिवादन करण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, मुंबई येथून हजारोंच्या संख्येने आगरी, कोळी बांधव हे माणकोली येथे आले होते. कार रॅलीमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटीलदेखील सहभागी झाले होते. ते म्हणाले की, दि.बा. पाटील यांचे नाव दिले नाही, तर नेपाळसारखी क्रांती नवी मुंबईत घडवून दाखवू.







