। पनवेल । प्रतिनिधी ।
मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यास सांगून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अकरा लाख 73 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चार अनोळखी ईसमाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल चार्ल्स हे नावडे फेस टू तळोजा येथे राहतात. त्यांना फेसबुकवर सोशल नेटवर्किंग ॲपवर शेअर मार्केट संबंधित कलेक्टिव्ह ट्रेनिंग ॲपबाबत जाहिरात दिसली. त्यांनी त्या नंबरवर संपर्क केला असता त्यांना समोरील इसमाने ऍपबाबत माहिती दिली आणि ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर 60 ते 90 टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पाच हजार रुपये भरून शेअर्स घेतले. एका आठवड्यात त्यांना भरलेली रक्कम दुप्पट झाल्याचे ॲपवर दिसले. त्यानंतर दुसऱ्या इसमाने दोन लाख 31 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. त्यात त्यांना तोटा झाल्याने तो तोटा भरून काढण्यासाठी काही शेअर्स खरेदी करावे लागेल, असे सांगून एक लाख 75 हजार रुपये भरण्यास सांगितले. असे एकूण 11 लाख 73 हजार रुपये त्यांनी भरले. मात्र भरलेले पैसे परत मागितले असता पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात आले.







