महामार्गावरील पथदिव्यातील केबलची चोरी; पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
सायन-पनवेल महामार्गावरील पथदिव्यांमधे बसवलेल्या वीजवाहिन्या चोरणारी टोळी महामार्गांवर कार्यरत आहे. वीजवाहिन्यांच्या चोऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत होऊन महामार्गांवर पसरणारा अंधार दूर करण्यासाठी विद्युत विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच याचा मोठा आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागत आहे.
सायन-पनवेल महार्गावर बेलपाडा गाव ते खांदा वसाहत या 8 किलोमीटर अंतरावरील 438 खांबांवर बसवण्यात आलेल्या 1 हजार 238 दिव्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी पनवेल पालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात येते. या कामाकरता पालिकेच्या माध्यमातून खासगी कंत्राटदार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. असे असताना अनेकदा मार्गावरील पथदिवे बंद असल्याचे निदर्शनास येत असल्याने बंद असलेल्या या दिव्यांबाबत पालिकेच्या विद्युत विभागाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पथदिव्यांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या वीजवाहिन्यांची चोरी केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2025 पासून आतापर्यंत तीन वेळा विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीजवाहिन्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच बेलापूर, खारघर तसेच कामोठे पोलीस ठाण्यात तशा स्वरूपाची तक्रारदेखील दाखल केली असल्याची माहिती दिली आहे. त्याचसोबत चोरी केलेल्या वीजवाहिन्यांची खरेदी करणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाविरोधात देखील तक्रार करण्यात आल्याची माहिती अधिकाराऱ्यांकडून देण्यात आली आहे.
वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. चोरट्यांनी आतापर्यंत 2 हजार 800 मीटर लांबीच्या वीजवाहन्यांची चोरी केली असून, बाजार भावाप्रमाणे 2 लाख 60 हजार अतिरिक्त रकमेचा भुर्दंड पालिकेच्या विद्युत विभागाला सहन करावा लागला आहे.







