उरण-भाजपा आमदारांच्या आंदोलनातील अनुपस्थितीमुळे प्रकल्पग्रस्त नाराज
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांच्याकडून करण्यात आलेल्या आंदोलनाकडे स्थानिक भाजपा नेत्यांनी पाठ फिरवल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीकरीता स्थापन करण्यात आलेल्या लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीवर भाजप नेत्यांचाच वरचष्मा असून, अध्यक्ष पद सोडल्यास उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदासोबत समितीच्या कार्यकारणीत तसेच सल्लागार पदावर भाजपच्या नेत्याचाच जास्त भरणा आहे. नामकरणाच्या मागणीकरीता यापूर्वी करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपच्या पनवेल, उरण आणि नवी मुबंईमधील स्थानिक नेत्यांचेच वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत होते. देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार असतानाही कृती समितीच्या नावाखाली करण्यात आलेल्या प्रत्येक आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांसोबत इतर पक्षातील कार्यकर्ते देखील हिरहिरीने सहभागी होत होते. अशावेळी नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या विमान उड्डाणाची तारीख जाहीर करण्यात आल्याने भाजपच्या स्थानिक नेतृवाच्या मागणीखातर विमानतळाला दिबांचेच नाव दिले जाईल आणि त्याचे श्रेय आपल्या पदरात पडेल या आशेवर असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरवण्याचे काम बाळ्या मामा यांनी केले. परिणामी, भिवंडी ते जासई या दिबांच्या जन्मस्थळापर्यत रॅली काढत केलेल्या आंदोलनात सामील न झालेले स्थानिक भाजप नेते बॅकफूटवर गेले आहे.
आंदोलनाचे केंद्र पनवेल, उरण बाहेर
नामकरण कृती समितीवर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाच्या असलेल्या वर्चस्वामुळे पनवेल, उरण आणि नवी मुबंई आंदोलनाचे केंद्र ठरले होते. खासदार बाळ्या मामा यांच्या आंदोलनामुळे प्रथमच आंदोलनाचा केंद्रबिंदू पनवेल, उरण बाहेर सरकला आहे.
कृती समितीचे उपाध्यक्षपद माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे आहे. परदेश दौऱ्यावर असल्याने रामशेठ आंदोलनात सामील होऊ शकले नसल्याचे बोलले जात आहे.तर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी असलेले भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर आणि ऐरोली विधानसभेचे भाजप आ. गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे देखील आंदोलनात सामील नव्हते. समितीच्या सल्लागार पदाची जवाबदारी भाजपचे माजी खा. कपिल पाटील आणि माजी खा. जगन्नाथ पाटील यांच्यावर टाकण्यात आली आहे. तर कार्यकारणीमध्ये भाजप आ. मंदा म्हात्रे, आ. महेश बालदी, माजी आ. योगेश पाटील, माजी आ. गणपत गायकवाड यांचा देखील समावेश आहे.
यापूर्वी झालेल्या आंदोलनात भाजप नेत्यांचे आमंत्रण स्वीकारून कृती समितीच्या बैठकीत भूमिपुत्रांनी उपस्थिती दर्शवली आहे. मग भूमिपुत्रांसाठी नेत्यांनीही बाळ्या मामांच्या पुढाकारे घेतलेल्या दिबा मानवंदना रॅलीत सहभागी व्हायला काय हरकत होती? उरणच्या आमदारांकडून तशीही अपेक्षा नाही. मात्र बाकीचे आमच्या रक्ताचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी दाखवलेल्या अनुपस्थितीमुळे समाजाने जो बोध घ्यायचा तो घेतला आहे. परंतू या निमित्ताने पुन्हा एकदा भूमिपुत्र बांधव एक झाला आहे. भूमीपुत्र लढत राहणार. कोणी येवो अगर न येवो नवी मुंबई विमानतळाला दिबांचंच नाव लागणार.
योगेश तरे,
कार्यकारणी सदस्य.







