| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या टिटवाळा, इंदिरा नगर, गणेश वाडी, बल्लाणी परिसरात अनधिकृतपणे तसेच सर्व्हीस वायरमध्ये छेडछाड करुन वीज वापर करणाऱ्या 66 वीज चोरांना महावितरणने दणका दिला आहे. या वीज चोरांच्या विरोधात वीज कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वीज चोरांनी 30.73 लाख रुपयांची वीज चोरी केली.
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या बल्लाणी, इंदिरा नगर, गणेश वाडी, टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी पथक तयार करून वीज मीटर तपासणी मोहीम हाती घेतली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या परिसरातील वीज ग्राहकांचे मीटर तपासण्यात आले. यावेळी वीज चोरी करणाऱ्या व्यक्ती वीज मीटर असून, देखील वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले तसेच, काहीजण सर्व्हीस वायरमध्ये छेडछाड करून अनधिकृतपणे वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा ग्रामीण शाखा कार्यालय अंतर्गत 66 ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. महावितरण कडून वीज चोरीचे मुल्यांकन केले असता वीज चोरांनी 1 लाख 21 हजार युनिट वीज चोरी केल्याचे आढळून आले. याचे मुल्यांकन 30 लाख 73 हजार रुपये आहे. वीज चोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास कठोर कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद वीज कायद्यात करण्यात आली आहे. वरील कारवाई महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, कल्याण दोन मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता व्ही.एस. फुंदे, कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता निलेश शिर्के, शाखा अभियंता तुकाराम घोडविंदे, धनंजय पाटील, सचिन पवार, योगेश चेंदवणकर यांनी पार पाडली.






