ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर; वशेणी गावातील महिला उतरल्या रस्त्यावर
| उरण | प्रतिनिधी |
दारुमुळे संसाराची होणारी राख रांगोळी आणि सततच वाद-विवाद काही नवीन नाहीत. त्यामुळेच दारुबंदी करण्याची मागणी वारंवार समोर येत असते. घरातील तरुण, लहान मुले दारूच्या आहारी गेल्यामुळे वशेणी गावातील महिलांनीच दारु बंदीसाठी आक्रमक भूमिका घेतली. वशेणी या गावात महिलांनी दारूचे दुकाने बंद करावेत या मागणी करता ग्रामसभेत एकमतानं ठराव मंजूर केला. तसेच वशेणी गावात दारूबंदी व लग्न समारंभातील हळदीच्या साड्या बंद करण्यासाठी जनजागृती मोहीम म्हणून चक्क महिला बुधवारी रस्त्यावर उतरल्या.
उरण तालुक्यातील वशेणी गावातील अवैध धंदे आणि दारूचे दुकाने बंद करावेत यासाठी महिला आणि ग्रामस्थांनी पोलीसांकडे मागणी केली. मात्र या गंभीर गोष्टीकडे गावातील पोलीस पाटील तसेच पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अबालवृद्ध विशेष करून तरुण मुले हे व्यसनाच्या आहारी गेलेत. त्यामुळे गावातील शांतता भंग झाली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन वारंवार वाद-विवाद होत आहेत. एकंदरीत संसाराची होणारी राख रांगोळी आणि सतत होणारे वाद यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महिलांनी आक्रमक भूमिका बजावली. वशेणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रजा बळीराम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी विद्या भाटकर तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थित ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि.16) एकमताने ग्रामसभेत दारुबंदीसाठी ठराव मंजूर करुन घेतला आहे.
दारू बंदीसाठी व लग्न समारंभातील हळदीच्या साड्या बंद करण्यासाठी वशेणी गावातील महिलांनी बुधवारी (दि.17) गावात जनजागृती संदर्भात रँलीचे आयोजन केले होते. यावेळी वशेणी गावच्या अनेक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. जोपर्यंत ही दारु बंद होत नाही, तोपर्यंत जनजागृती सुरूच राहील अशी भूमिका महिला व ग्रामस्थांनी घेतली आहे.
वशेणी येथे गेल्या काही वर्षापासून गावठी दारू विक्री खुलेआम सुरू आहे. गावातील लहान बालक तसेच तरुण वर्गाला दारूचे व्यसन लागले असून काहींचे संसार मोडले आहेत. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. तसेच लग्न समारंभातील हळदीच्या साड्यावर वारेमाप होणारा खर्च टाळण्यासाठी पडलेली साड्यांची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
– अनामिका हितेंद्र म्हात्रे, सरपंच, वशेणी ग्रामपंचायत







