| पनवेल | वार्ताहर |
खारघरमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या आठ आफ्रिकन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नागरिकांविरोधात आणि त्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या दोन सदनिका मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आफ्रिकन नागरिकाकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसताना तो वास्तव्य करत असल्याचे आढळून आल्याने त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सेक्टर-27 मधील चौधरी ईलाईट को. ऑप. सोसायटीत राहणाऱ्या इफियानी युगोचुक्यु या आफ्रिकन नागरिकाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, त्याच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे आढळून आले. तसेच तो ज्या फ्लॅटमध्ये राहण्यास होता, त्या फ्लॅट मालकाने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर सी फॉर्ममध्ये न भरता त्याला फ्लॅट भाड्याने दिल्याचे आढळून आले. त्यामुळे खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आफ्रिकन नागरिकाला अटक केली आहे. तर खारघर सेक्टर-34 ए मधील फरशीपाडा येथील फौजिया मेन्शन या इमारतीत 7 आफ्रिकन नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी पोलिसांनी केली.







