| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आंबिवली गावच्या वळणावर टेम्पो गाडीला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक गाडी मध्ये अडकला होता, त्या चालकाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर रायगड हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.
कर्जत -कल्याण राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. ग्रुप ग्रामपंचायत माणगाव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर गुरुवारी (दि.18) दुपारी तीनच्या सुमारास अपघात घडला. टेम्पो नेरळ दिशेकडून कर्जत दिशेकडे जात होता. तसेच पाण्याचा टँकर नेरळ दिशेकडून आंबिवली रेल्वे फाटकाकडे जात होता. दरम्यान, टेम्पो कर्जत दिशेकडे जात असताना त्याचवेळेस वेळेस पाण्याचा टँकर हा आंबिवली दिशाकडे वळल्याने टेम्पो हा टँकरला पाठीमागच्या बाजूने धडकला. या अपघातामध्ये टेम्पोचे खूप मोठे नुकसान झाले असून, टेम्पो चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. ही धडक इतकी जोरात होती की त्या टेम्पोचा पुढील भाग आत मध्ये आल्याने टेम्पो चालक गाडी मध्ये अडकला होता. कर्जत- कल्याण राज्य मार्गाने प्रवास करणारे अनेक वाहनचालक या घटनास्थळी थांबले होते. तेथील उपस्थित वाहनचालकांनी टेम्पोत अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. आंबिवली व माणगांव गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना रस्त्याला गतिरोधक नसल्याने अनेक वेळा वाहन आपल्या गावाकडे फिरवताना अपघाताची भीती वाटत असते.







