। मुंबई । प्रतिनिधी ।
19 वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पुजाऱ्याने मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजेश गोस्वामी (52) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. तो कांदिवलीच्या लालजीपाडा येथील तारकेश्वर महादेव मंदिरात पुजारी होता. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे अटक आणि बदनामीच्या भीतीपोटी त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गोस्वामी हा पुजारी म्हणून काम करत होता. कांदिवलीच्या गणेशनगर येथील लालजीपाडा मधील तारकेश्वर महादेव मंदिरात तो पुजारी होता. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मंदिरात गळ्यातील उपरण्याने त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठवला. त्याने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातर राहणारी एक 19 वर्षीय तरुणी या मंदिरात जात असे. मृत पुजारी राजेश गोस्वामी याने या तरूणीला मेसेज करून शरीरसुखाची मागणी केली होती. संतापलेल्या तरुणीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास तरुणी तिच्या वडिलांना घेऊन तक्रार करण्यासाठी कांदिवली पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांनी त्यांना सकाळी गुन्हा दाखल करण्यास बोलावले. दरम्यान, पोलिसांनी पुजाऱ्याचा शोध सुरू केला होता. परंतु, तो आढळला नाही. दुसऱ्या दिवशी गोस्वामीचा मृतदेह मंदिरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. राजेश गोस्वामी हा मूळचा मध्यप्रदेशातील होता. तो विवाहित असून, त्याला 2 मुले आणि 2 मुली आहेत. त्याचा एक मुलगाही पुजारी आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.






