| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथे सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्र वावरत असल्याचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आणि संरक्षणाचा मुद्दा त्यावेळी ऐरणीवर आला होता. आता पुन्हा एकदा खारघर वसाहतीत भटक्या कुत्र्यांसोबत फिरणारी सोनेरी कोल्ह्याची जोडी दिसून आली असून, दीपक सिंग यांनी आपल्या मोबाईलमध्ये सोनेरे कोल्ह्यांची जोडी कैद केली आहे.
खारघर वसाहती शेजारी असलेल्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता अस्तित्वात असून, विविध प्रकारचे पशु आणि पक्षी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. खारघरमध्ये विकासासाठी होत असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणची जैवविविधता धोक्यात आली आहे. अशातच या ठिकाणी वास्तव्यास असलेले जंगली प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत घुसखोरी करू लागले आहेत. खारघर शहरालगतच्या खाडीकिनारी भागात मागील काही वर्षांपासून सोनेरी कोल्ह्यांचा मुक्त संचार वाढला आहे. दरम्यान, खारघरमधील वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस दोन सोनेरी कोल्हे आढलेले होते. तसेच, सेंट्रल पार्कमध्येही कोल्ह्यांचा खुलेआम वावर पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी खारखरमधील सेक्टर 15 मधील रस्त्यावर सोनेरी कोल्हा मृतावस्थेत आढळला होता. मानवी वस्तीत कोल्ह्यांचा वावर वाढल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.






