| उरण | प्रतिनिधी |
दीव-दमण येथील अवैध दारू शेकडो किलोमीटरचा प्रवास करून खुलेआम विक्रीसाठी रायगड जिल्ह्यात पोहोचत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. उरणमध्ये सर्रासपणे अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने दीव-दमणची दारू आव्वाच्या सव्वा किंमतीत विकली जात आहे. ही दारू कमी दर्जाची किंवा अवैध असल्याने त्यात मिथेनॉलसारख्या विषारी पदार्थांचे मिश्रण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यावर थेट गदा येत आहे.
दमण हे गुजरात सीमेलगत असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात दारू महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात दारूवर उच्च कर असल्यामुळे दमणची दारू काळ्या बाजारात जादा दरात विकली जाते. या बेकायदेशीर व्यवहारामुळे शासनाचा दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. पोलीस विभागाने थोडाफार पायबंद घालण्याचा प्रयत्न केला असला तरी पूर्ण अंकुश लावण्यात ते अपयशी ठरले आहे. तसेच, दारूबंदी असलेल्या ठिकाणी असे खुले व्यवहार सुरू असतील तर पोलीस प्रशासन गप्प का आहे? दारूमाफिया कोणा अधिकाऱ्याच्या आश्रयाखाली हे सर्व चालवत आहे? दारूमाफियांच्या संगनमताला जबाबदार कोण? असे प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहेत. शासनाने तात्काळ कठोर कारवाई करून दारूमाफियांचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून होत आहे.







