| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, अनेक प्रमुख देवी मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. लोणावळ्याजवळील वेहेरगाव गडावर असलेल्या कुलस्वामिनी एकविरा देवीच्या दर्शनासाठी देखील पहाटेपासून भक्ताची मांदियाळी जमली आहे. तर, पुढील काही दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.
नवरात्रोत्सवात एकविरा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र दुडी यांनी वाहतुकीच्या पद्धतींमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान, जड आणि मोठ्या वाहनांना कार्ला फाटा ते श्री एकवीरा देवी पैठ मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरून जाण्यास पूर्णपणे बंदी असणार आहे. तसेच, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत, जुन्या मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोल प्लाझावर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यायी मार्ग म्हणून मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड आणि मोठी वाहने एक्सप्रेस हायवे आणि उर्से टोल प्लाझावरून लोणावळ्यातील कुसगाव बुद्रुक टोल प्लाझावरून पुणे शहरात जाण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच, पुणे-मुंबईकडे जाणारी जड आणि मोठी वाहने महामार्गावरून वडगावमधील तळेगाव फाटा आणि उर्से खिंडी मार्गे मुंबईकडे जातील.






