सूर्याने दाखवला पाकिस्तानला आरसा
| दुबई | प्रतिनिधी |
यापुढे भारत-पाक क्रिकेट द्वंद्व असे म्हणू नका, ताकद आणि क्षमता समान असते तेव्हा द्वंद्व म्हटले जाते. आता हे त्यांच्यात शिल्लक आहे का? जेव्हा साधारणतः 15 सामने होतात तेव्हा 8-7 असे गुण असतात तेव्हा तुल्यबळ लढत असे म्हटले जाते, परंतु आम्ही त्यांच्यावर 13-1 किंवा 13-2 असे वर्चस्व मिळवले आहे, अशा शब्दात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान संघाची लक्तरे काढली आहेत. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (दि.21) झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पुन्हा एकदा एकतर्फी पराभव केला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाक पत्रकाराने सूर्यकुमारला पाकिस्तानने कशी झुंज दिली, असा प्रश्न विचारताच सूर्यकुमार यादवने हसत हसत पाकिस्तानला आरसा दाखवला.
सलग दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाला जोरदार पराभवाचा झटका भारतीय संघाने दिला. सामन्यात अनावश्यक ठिणग्या पाडायचा पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या प्रयत्नांचे हसे झाले. भारतीय खेळाडूंनी पद्धतशीरपणे बॅट-बॉलने त्याला उत्तर दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेतही सूर्यकुमारने पाकला आरसा दाखवला. रविवारच्या लढतीत पाकिस्तानी संघ आक्रमणाचा पक्का विचार घेऊन मैदानात उतरला होता. त्यांना कसेही करून पहिल्या सामन्यातील अपमानाचा बदला घ्यायचा होता. अडचण एकच होती की क्रिकेट युद्ध रंगवायला त्यांच्याकडे यंत्रसामग्री अत्यंत अपुरी होती. शून्यावर जीवदान लाभलेल्या साहिबजादा फरहानने अर्धशतक केल्यावर बॅटचा वापर स्टेनगनसारखा करून केलेली कृती लज्जास्पद होती. 171 धावा उभारल्यावर पाकिस्तानला वाटले की आपण भारतीय संघाला रोखू शकतो, परंतु तसेही झाले नाही. अभिषेक शर्मा-शुभमन गिलने शतकी भागीदारी रचून आव्हान सहजी पेलल्यावर पाकिस्तानी गोलंदाजांचा तीळपापड व्हायला लागला. पहिले शाहीनशाह आफ्रिदीने उगाच बोलाचाली केली. नंतर हारीस राऊफने मर्यादा ओलांडताना दोघा सलामीविरांशी उगाच बोलाचाली चालू केली.
रविवारच्या सामन्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. दोन लक्षणीय चुका या क्षेत्ररक्षण आणि बुमराच्या गोलंदाजीत स्वैरपणा दिसला त्या होत्या. क्रिकेटच्या खेळात चुका होतात. झेल सुटतात. मी इतके सांगेन की क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक दिलीप यांनी लगेच सगळ्यांना संदेश पाठवून सराव करायला लागेल सांगितले आहे. आम्ही झालेल्या चुका कशा सुधारता येतील यासाठी मैदानावर सराव करून प्रयत्न करू. बुमराच्या गोलंदाजीची मला काही चिंता वाटत नाही. कधी कधी योजना डोक्यात असते ती एखाद्या सामन्यात राबवणे जमत नाही इतकेच, असे सूर्यकुमार यादव सामन्यानंतर बोलताना म्हणाला. तुम्ही फक्त बोलता, आम्ही कृती करतो, असे अभिषेकने हारीस राऊफला मैदानावरच तिथल्या तिथे कमीतकमी शब्दांत ठणकावले.
तसेच, पाकिस्तान संघ केवळ आणि केवळ वल्गना करण्यात, बढाया मारण्यात धन्यता मानतो आहे. प्रशिक्षक माईक हॅसन यांनी मोहम्मद नवाज जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असल्याची वाच्यता केली होती. नवाजला कप्तान सलमान आघाने रविवारच्या सामन्यात एकही षटक टाकायला बोलावले नाही. म्हणजेच सलग दोन पराभवानंतर तरी क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, हे पाक क्रिकेटला उमगले असेल.







